मेहकर – आगामी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेहकरमध्ये राजकीय हालचालींना जोरदार वेग आला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहराध्यक्ष किशोर गारोळे हे नगराध्यक्षपदासाठी सर्वाधिक चर्चेत असून, पक्षश्रेष्ठींपासून ते मतदारांपर्यंत त्यांच्या उमेदवारीला सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसतोय. मात्र, या यशस्वी राजकीय समीकरणामागे एक अत्यंत महत्त्वाची आणि परिणामकारक व्यक्ती आहे – ती म्हणजे आमदार सिद्धार्थ खरात.
सिद्धार्थ खरात – नेतृत्व, विश्वास आणि विकासाचं वचन मेहकर-लोणार मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार सिद्धार्थ खरात यांनी अतिशय कमी कालावधीत प्रचंड जनसंपर्क निर्माण केला आहे. जनतेशी थेट संवाद, प्रश्नांवर तत्काळ कृती आणि मतदारसंघातील विकासाचा स्पष्ट दृष्टिकोन यामुळे त्यांचं व्यक्तिमत्त्व सर्वसामान्यांमध्ये प्रभाव टाकणारं ठरत आहे. त्यांच्या नेतृत्वात मेहकरचा चेहरामोहरा बदलणार, हे स्वप्न आता हळूहळू साकार रूप धारण करत आहे. खरात यांचा पाठिंबा असलेला कोणताही उमेदवार म्हणजे जणू यशाची गारंटीच मानली जाते, आणि किशोर गारोळे यांना मिळणारा हा पाठिंबा हीच त्यांची मोठी ताकद आहे. किशोर गारोळे – सर्वधर्मसमभावाचा चेहरा, नव्या राजकारणाचा विश्वास किशोर गारोळे हे राजकारणातील एक स्वच्छ, विश्वासार्ह आणि जनतेतून उभं राहिलेलं व्यक्तिमत्त्व आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांमध्ये लोकप्रिय, कोणत्याही जातीधर्माच्या व श्रद्धेच्या लोकांमध्ये सहज मिसळणारे आणि प्रत्येक सण-उत्सवात सक्रिय सहभाग असलेले गारोळे हे 'आपलं माणूस' म्हणून ओळखले जातात.
महाविकास आघाडीचा, शिवसेनेचा आणि स्थानिक मुस्लिम व इतर घटकांचा मिळालेला मजबूत पाठिंबा त्यांना नगराध्यक्षपदासाठी आघाडीवर नेत आहे. विशेष म्हणजे काँग्रेसमधूनही त्यांच्या नावाला सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे सूत्रांकडून कळते. ‘तडजोड नाही – विकासासाठी निर्धार’सूत्रांच्या माहितीनुसार, मेहकरसाठी कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचं ठाम मत शिवसेनेतून व्यक्त करण्यात आलं आहे. लोणार किंवा जिल्हा परिषदेसाठी समन्वयाचा विचार असला, तरी मेहकर नगर परिषदेवर शिवसेनेचाच झेंडा फडकवण्याचा निर्धार सिद्धार्थ खरात यांनी अनेकदा जाहीर केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, “नगर परिषद जर आपल्या ताब्यात आली, तर मेहकरचा विकास रोखणं कोणाच्याही शक्तीबाहेरचं राहील!”
एक विजयी युती – खरात + गारोळे = बदललेला मेहकर आजच्या घडीला मेहकरमध्ये एक गोष्ट स्पष्टपणे दिसून येते – आमदार सिद्धार्थ खरात यांचं नेतृत्व आणि किशोर गारोळे यांचं स्थानिक लोकांमधलं प्रचंड बळ, यांची सांगड ही शिवसेनेसाठी विजयाची खात्री आहे. मेहकरसाठी हवे असलेले नेतृत्व आणि गरज असलेला चेहरा म्हणजे किशोर गारोळे!" अशी भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली असून, नगराध्यक्षपदासाठीची ही चुरस आता अधिकच रंगतदार होणार आहे.