साखळी खु. येथे जल अर्पण दिवस उत्साहात साजरा
पाऊस पाणी संकलनावर भर द्यावा - गटविकास अधिकारी डॉ. अमिता पवार
बुलढाणा ग्रामीण भारतात जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा पायाभूत सुविधा आता उभारल्या गेल्यामुळे गावे पाणीपुरवठा प्रणालीच्या संचालन आणि देखभाल दुरुस्तीच्या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यात प्रवेश करत आहेत. या केवळ पायाभूत सुविधा नसून समुदाय आणि सरकार यांच्यातील अनेक वर्षाचा आशावाद, प्रयत्न आणि भागीदारीचे प्रतीक आहे. या योजना पूर्ण झाल्यानंतर त्यांचे हस्तांतरण काळजीपूर्वक, स्पष्टतेने आणि सामायिक अभिमानाने केले पाहिजे. ज्यामुळे पाणी व्यवस्थापनाची जबाबदारी ग्रामपंचायत, ग्राम आरोग्य पोषण पाणीपुरवठा व स्वच्छता समिती आणि समुदायाच्या हाती येईल .जे आता त्यांच्या गावाच्या पाणीपुरवठा प्रणालीचे संरक्षक म्हणून नेतृत्व करतील. यासाठी दिनांक 8 मार्च ते 22 मार्च दरम्यान देशभर जल जीवन मिशन योजनेअंतर्गत जल उत्सव साजरा करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज बुलढाणा तालुक्यातील साखळी खुर्द येथे जल अर्पण दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमा दरम्यान पाऊस पाणी संकलनावर भर देण्याचे आवाहन पंचायत समिती बुलढाणाच्या गटविकास अधिकारी डॉ. अमिता पवार यांनी केले.
देशभर राबविण्यात येत असलेल्या जल उत्सवा मध्ये दिनांक 8 ते 22 मार्च दरम्यान जी गावे हर घर जल घोषित झालेली आहेत, आणि योजना हस्तांतरित झालेल्या आहेत अशा गावांमध्ये जल अर्पण दिवस साजरा करण्यात येत आहे. यासाठी तांत्रिक पूर्वतयारी करायची आहे त्यामध्ये 15 ते 30 दिवसाचे नळ पाणी पुरवठा योजनेची चाचणी घ्यायची आहे. योजनेचे उपंगाची पाहणी व पडताळणी करायची आहे. दस्तऐवजाची उपलब्धता असणे गरजेचे आहे. पाणी गुणवत्तेचे फिल्ड टेस्ट किटद्वारे तपासणी करायची आहे. तसेच संस्थात्मक पूर्वतयारी यामध्ये महत्त्वाची आहे. बँक खात्यासह कार्यान्वित पाणीपुरवठा स्वच्छता समिती असणे गरजेचे आहे. प्रशिक्षित मनुष्यबळ जसे ऑपरेटर, नल जल मित्र यांची आवश्यकता आहे. स्त्रोत शाश्वतता आणि सुरक्षितता आराखडा यामध्ये गरजेचा आहे. ग्रामपंचायत, ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा स्वच्छता समिती ऑपरेटर यांचे प्रशिक्षण तत्पूर्वी होणे अनिवार्य आहे. शासनाच्या निर्देशाप्रमाणे हस्तांतरण चे दस्तऐवजीकरण अनिवार्य आहे. तसेच लोकसभागीय जाणीव जागृती ही यासाठी गरजेची आहे. ग्रामसभा घेणे पीआरएचे आयोजन करणे फिल्ड टेस्ट किटचे प्रात्यक्षिक करणे, बचत गट सदस्य, अशा, अंगणवाडी सेविका, शिक्षक, युवक इत्यादींचा सुरक्षित पाणी व्यवस्थापनामध्ये सहभाग घेणे, विविध स्पर्धाचे आयोजन करणे, असे विविध उपक्रम यादरम्यान राबवणीच्या सूचना आहेत. त्यानुसार बुलढाणा तालुक्यातील साखळी खुर्द या गावांमध्ये 17 मार्च रोजी जल अर्पण दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमादरम्यान जल पूजन, नळपूजन, जल प्रतिज्ञा विद्यार्थ्यांचे पाण्याबाबतचे भारुड, गाणे, नृत्य सादरीकरण, शालेय विद्यार्थ्यांची प्रभात फेरी, उपस्थित यांना पाण्याबाबत मार्गदर्शन आदी उपक्रम राबवून जल अर्पण दिवस साजरा करण्यात आला.. ग्रामपंचायत साखळी खुर्द चे सरपंच पंडित बळीराम हिवाळे यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच गटविकास अधिकारी डॉ. अमिता पवार या प्रमुख पाहुणे म्हणून लाभल्या होत्या. अध्यक्षीय भाषणामध्ये सरपंच पंडित हिवाळे यांनी पाण्याबाबत आजच सर्वांना जागरूक राहून पाण्याचा सूक्ष्म नियोजन करून व्यवस्थापन करण्याचे आवाहन केले. तसेच उप अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग बुलढाणा नितेश घुसळकर यांनी शासनाच्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे जलारपण दिवस उपक्रमाबाबत उपस्थितांना माहिती दिली. जल प्रतिज्ञा जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे संदीप सुखधान यांनी घेतली तसेच मनीषा शेजव यांनी उपस्थिताना पाणीपुरवठा स्वच्छता समिती बाबत तसेच पाऊस पाणी संकल्पना बाबत मार्गदर्शन केले. शाखा अभियंता शुभम बारोटे यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमाला साखळी खु. चे उपसरपंच, माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, महिला बचत गट सदस्य, गावकरी, शालेय शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घेऊन पाण्याबाबत कृतज्ञता व्यक्त केली आणि भविष्यात पाण्याचा अपव्यय करणार नाही हा संकल्प केला.
या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन उप अभियंता नितेश घुसळकर यांच्या चमुने, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे संदीप सुखधान, मनीषा शेजव, किरण शेजोळे यांनी तसेच गट संसाधन केंद्राच्या जया गवई, वर्षा खैरे यांनी केले.
.jpg)