डोणगावात Dongaonvat ‘बोगस शाळे’चा आरोप; शिक्षण विभाग हादरला ! - Apala Vidarbha LIVE

Breaking

Monday, May 25, 2026

डोणगावात Dongaonvat ‘बोगस शाळे’चा आरोप; शिक्षण विभाग हादरला !


मान्यता नाही, ‘यूडायस’ नाही… तरीही सुरू शिक्षणाचा गोर...धंदा ?

गरीब पालकांची लाखोंची लूट झाल्याचा गंभीर आरोप; फौजदारी कारवाईची मागणी

मेहकर तालुक्यातील डोणगाव येथे कोणतीही शासकीय मान्यता नसताना आणि ‘यूडायस’ क्रमांकाविना शाळा सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी डोणगाव येथील सामाजिक कार्यकर्ते रविकांत आढाव यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडे लेखी तक्रार दाखल करत संबंधितांवर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.

तक्रारीनुसार, डोणगावातील आरेगाव रोड परिसरात केजी ते चौथीपर्यंत वर्ग चालवले जात असून, संबंधित शाळेकडे शासनाची कोणतीही अधिकृत मान्यता नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर विद्यार्थ्यांचे दाखले आणि टीसी देण्यासाठी इतर मान्यताप्राप्त शाळांचा वापर केल्याचा गंभीर आरोपही तक्रारीत नमूद करण्यात आला आहे.विशेष म्हणजे, प्रत्यक्ष शिक्षण एका ठिकाणी आणि कागदोपत्री नोंदी दुसऱ्याच शाळेत दाखवल्या जात असल्याचा आरोप होत असल्याने शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या संपूर्ण प्रकारात गरीब आणि सर्वसामान्य पालकांची दिशाभूल करून लाखो रुपयांची फी उकळण्यात आल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे.सन 2024-25 या कालावधीतील संपूर्ण शैक्षणिक व्यवहार, फी वसुली, विद्यार्थी नोंदी आणि मान्यतेसंदर्भातील कागदपत्रांची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. गावात या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू असून प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

रविकांत आढाव यांनी 18 मे 2026 रोजी शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज सादर करून सात दिवसांत कारवाईची मागणी केली आहे. अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. या तक्रारीची प्रत मुख्यमंत्री कार्यालयासह संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही पाठविण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.दरम्यान, जर शाळा अनधिकृत असेल तर इतके दिवस प्रशासन झोपले होते का? असा सवालही आता ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे डोणगावातील कथित ‘बोगस शाळा’ प्रकरण आता जिल्हाभर चर्चेचा विषय ठरत आहे.

Post Top Ad

-->