समाजकारणातून राजकारणाकडे… मेहकरच्या राजकारणात युवा नेतृत्व म्हणून आकाश सास्ते पाटील यांची दमदार एन्ट्री
बुलढाणा-मेहकर सामाजिक बांधिलकी, व्यावसायिक क्षेत्रातील यशस्वी वाटचाल आणि सर्वसामान्य नागरिकांशी कायम ठेवलेला थेट संवाद या बळावर जिल्हाभर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे आकाश सास्ते पाटील यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करून मेहकर तालुक्याच्या राजकारणात दमदार पाऊल टाकले आहे. नुकतीच त्यांच्यावर भाजपच्या मेहकर तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली असून, पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी संघटन बळकटीकरणाबरोबरच जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याची भूमिका स्वीकारली आहे. व्यवसाय आणि समाजकारण यांचा समतोल साधत आकाश सास्ते पाटील यांनी गेल्या काही वर्षांत विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांशी विश्वासाचे नाते निर्माण केले आहे. समाजातील विविध घटकांच्या अडचणी समजून घेत त्या सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणारे युवा नेतृत्व म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. याच अनुभवाच्या बळावर त्यांनी आता राजकारणाच्या माध्यमातून व्यापक स्तरावर लोकसेवा करण्याचा संकल्प केला आहे.राज्यात महायुतीची सत्ता आणि मेहकर तालुक्यात अनुभवी नेतृत्व असतानाही स्वतःच्या कार्यशैलीतून वेगळी छाप निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न दिसून येत आहे. पदाची जबाबदारी स्वीकारताच त्यांनी केवळ संघटनात्मक बैठकींपुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष जनतेमध्ये जाऊन प्रश्न जाणून घेण्यास आणि त्यावर तत्काळ कार्यवाही करण्यास सुरुवात केली आहे.याचे पहिले उदाहरण म्हणजे मेहकर येथे रस्त्याच्या मागणीसाठी सुरू असलेले शेतकऱ्यांचे आमरण उपोषण. चार दिवसांपासून आंदोलन सुरू असूनही तोडगा न निघाल्याची माहिती मिळताच आकाश सास्ते पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट देत शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर तहसीलदार आणि संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. सकारात्मक चर्चेनंतर आंदोलनाची सांगता झाली. यावेळी शेतकऱ्यांनी प्रशासनासह आकाश सास्ते पाटील यांच्या पुढाकाराचे स्वागत करत समाधान व्यक्त केले.
याचबरोबर २६ जून रोजी मेहकर येथे उभारण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाच्या विकासकामांची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. उद्यानातील कामांची प्रगती, नियोजन आणि उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याबाबत संबंधितांकडून सविस्तर माहिती घेत त्यांनी कामांचा आढावा घेतला. राजकारणात नव्याने जबाबदारी स्वीकारल्यानंतर अल्पावधीतच जनतेच्या प्रश्नांमध्ये सक्रिय सहभाग, विकासकामांबाबतची जागरूकता आणि संघटनात्मक कामाला दिलेले प्राधान्य यामुळे आकाश सास्ते पाटील यांच्या कार्यशैलीची चर्चा सुरू झाली आहे. समाजकारणातून राजकारणाकडे झालेली त्यांची वाटचाल ही केवळ पदापुरती मर्यादित नसून जनतेच्या विश्वासाला न्याय देण्याच्या उद्देशाने असल्याचे त्यांच्या सुरुवातीच्या कामातून दिसून येत आहे. मेहकर तालुक्याच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात नव्या पिढीचे नेतृत्व म्हणून आकाश सास्ते पाटील यांच्याकडे पाहिले जात असून, आगामी काळात त्यांच्या कार्याची दिशा आणि जनतेशी असलेला संवाद हेच त्यांच्या नेतृत्वाचे खरे मोजमाप ठरणार आहे.

