चॉकलेट नाही... शाळेसाठी रस्ता हवा! विद्यार्थ्याच्या एका मागणीला MLA Siddharth Kharat आमदार सिद्धार्थ खरात यांचा प्रतिसाद - Apala Vidarbha LIVE

Breaking

Thursday, July 16, 2026

चॉकलेट नाही... शाळेसाठी रस्ता हवा! विद्यार्थ्याच्या एका मागणीला MLA Siddharth Kharat आमदार सिद्धार्थ खरात यांचा प्रतिसाद


चॉकलेट नाही... शाळेसाठी रस्ता हवा! विद्यार्थ्याच्या एका मागणीला आमदार सिद्धार्थ खरात यांचा प्रतिसाद

जिजामाता कन्या शाळेचा सिमेंट रस्ता महिनाभरात पूर्ण

मेहकर : लहान मुले नेते, पाहुणे किंवा मोठ्या व्यक्तींना भेटली की चॉकलेट, खाऊ किंवा एखादी छोटी भेटवस्तू मागतात. पण मेहकर येथील एम.ई.एस. जिजामाता माध्यमिक कन्या शाळेतील एका विद्यार्थ्याने स्वतःसाठी काहीही न मागता आपल्या शाळेसाठी पक्का रस्ता मागितला. या निरागस आणि समाजाभिमुख मागणीला आमदार सिद्धार्थ खरात यांनी तत्काळ प्रतिसाद देत अवघ्या एका महिन्यात शाळेकडे जाणारा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला सिमेंट काँक्रीट रस्ता आपल्या आमदार निधीतून पूर्ण करून दिला. या विकासकामामुळे विद्यार्थीनी, शिक्षक, पालक आणि परिसरातील नागरिकांची अनेक वर्षांची गैरसोय दूर झाली आहे. पावसाळ्यात चिखल आणि अडचणींचा सामना करणाऱ्या विद्यार्थिनींना आता सुरक्षित, स्वच्छ आणि सुकर मार्ग उपलब्ध झाला आहे. एका विद्यार्थ्याच्या संवेदनशील विचाराला दिलेला हा प्रतिसाद केवळ विकासकाम नसून विद्यार्थ्यांच्या भावनांचा सन्मान असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. शाळेच्या वतीने आमदार सिद्धार्थ खरात यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

मुख्याध्यापिका संकल्पना सुधीर मुळे यांनी आभारपत्र देत शिक्षण क्षेत्राप्रती त्यांनी दाखविलेल्या विकासाभिमुख भूमिकेचे कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत केलेले हे काम शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचे ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे, चिरंजीव स्वरांश सुमित घोडे यांनी शाळेच्या रस्त्याबाबत केलेल्या मागणीची आमदार सिद्धार्थ खरात यांनी तातडीने दखल घेत निधी उपलब्ध करून दिला आणि अनेक वर्षांपासून रखडलेला प्रश्न मार्गी लावला. एका विद्यार्थ्याच्या मनातील शाळेप्रती असलेले प्रेम आणि त्या भावनेचा मान राखणारा लोकप्रतिनिधी, अशी या घटनेची परिसरात चर्चा होत आहे. यावेळी युवा सेना तालुकाप्रमुख अँड. आकाश घोडे, मुख्याध्यापिका संकल्पना सुधीर मुळे, पर्यवेक्षक अरविंद रामराव चव्हाण, दिलीप मिठाराम पाटकर, परिमल हनुमंतराव धोपटे, स्वप्निल राजेंद्र दळवी, प्रवीणकुमार तुळशीराम चंदनकार, गजानन दिगंबर दळवे, अविनाश अशोक आडेलकर, ज्येष्ठ शिक्षिका विद्या सुनील धरमकार, वर्षा नीरज देशपांडे, स्मिता नितीन कुलकर्णी, ललिता मोहन ठोसर, अरुणा विजय इंगळे, संजय महादू चराटे तसेच इतर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळा व्यवस्थापनाने आमदार सिद्धार्थ खरात यांनी शिक्षण क्षेत्रासाठी दिलेल्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत, भविष्यातही अशाच विकासकामांतून विद्यार्थ्यांना लाभ मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

Post Top Ad

-->