बुलडाणा ईदचा उत्साह असतानाच खामगावात एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे.शहरातील जनना तलाव परिसरात पोहण्यासाठी गेलेला एक तरुण पाण्यात बुडाल्याची घटना घडली असून, या घटनेमुळे संपूर्ण शहरात मोठी खळबळ उडाली आहे. अरसान नईम खाटिक वय अंदाजे 18 वर्ष रा. बडे प्लॉट,असे पाण्यात बुडालेल्या तरुणाचे नाव आहे.
आज ईदचा सण असल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. बडे प्लॉट भागातील अरसान नईम खाटिक हा आपल्या एका मित्रासह जनना तलाव येथे दुपारी 2:30 वाजता सुमारास पोहण्यासाठी गेला होता. मात्र, पाण्यात उडी घेतल्यानंतर अरसानला पाण्याचा अंदाज आला नाही आणि तो खोल पाण्यात गटांगळ्या खाऊ लागला.आपला मित्र बुडत असल्याचे पाहून त्याच्यासोबत असलेल्या दुसऱ्या तरुणाने आरडाओरड करून मदतीसाठी याचना केली.सुरुवातीला मदतीला कोणीही धावून आले नाही, मात्र त्यानंतर त्याच्या किंकाळ्या ऐकून परिसरातील नागरिकांनी तलावाकडे धाव घेतली. स्थानिकांनी तातडीने पाण्यात शोधमोहीम सुरू केली, मात्र तासाभराच्या प्रयत्नानंतरही अरसानचा पत्ता लागला नाही. घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने प्रशासनाला पाचारण करण्यात आले.माहिती मिळताच एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून, आधुनिक साधनांच्या साहाय्याने अरसानचा शोध घेणे सुरू आहे. ही बातमी शहरात वाऱ्यासारखी पसरताच जनना तलाव परिसरात हजार च्या नागरिकांनी गर्दी केली होती. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि शोधकार्यात अडथळा येऊ नये म्हणून खामगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून चोख बंदोबस्त लावला आहे. आज आनंदाचा सण असलेल्या ईदच्या दिवशीच ही दुर्घटना घडल्याने बडे प्लॉट परिसरासह संपूर्ण खामगाव शहरावर शोककळा पसरली आहे. सध्या युद्धपातळीवर शोधकार्य सुरू असून, अरसानचा शोध लागण्याची प्रतीक्षा नागरिक करत आहेत.
.jpg)