युद्धजन्य परिस्थितीमुळे संपूर्ण देशभरात एलपीजी गॅस सिलेंडरचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर निर्माण झाला असून सर्वसामान्य नागरिकांना गॅस सिलेंडर मिळणे कठीण झाले आहे. अशातच शासनाने गॅस सिलेंडरच्या नियमावलीत कठोर बदल केल्याने व्यवसायिकांसह सर्वसामान्य नागरिकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर धुळ्यातील युवा उद्योजक राहुल कुलकर्णी यांनी आपल्या संकल्पनेतून बायोमास इंधनाचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. त्यांच्या या अत्याधुनिक पद्धतीच्या इंधनाला सध्या चांगलीच मागणी वाढत आहे.
युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस सिलेंडरचा प्रश्न अधिक बिकट झाला असून अनेक हॉटेल व्यवसायिकांना आपली हॉटेल्स बंद करण्याची वेळ आली आहे. तसेच सर्वसामान्य नागरिकांनाही घरगुती गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
अशा परिस्थितीत धुळे येथील एमआयडीसी परिसरातील युवा उद्योजक राहुल कुलकर्णी यांनी बायोमास इंधनाची निर्मिती केली आहे. शेतातील वाया जाणारा पालापाचोळा तसेच धान्याचे टाकाऊ अवशेष यांचा वापर करून हे बायोमास तयार केले जात आहे. यासोबतच त्यांनी अत्याधुनिक पद्धतीची शेगडीही विकसित केली आहे.
या शेगडीत पालापाचोळा, टाकाऊ लाकूड तसेच इतर जैविक अवशेष टाकून ती प्रज्वलित केली जाते. यामुळे हॉटेल व्यवसायिक तसेच घरगुती वापरासाठी अत्यंत कमी खर्चात इंधन उपलब्ध होत आहे. परिणामी या बायोमास इंधनाला नागरिकांकडून मोठी मागणी वाढली आहे.
धुळे शहर आणि जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांतूनही या इंधनाला मोठ्या प्रमाणावर मागणी येत असल्याची माहिती राहुल कुलकर्णी यांनी दिली आहे.
हॉटेल व्यवसायासाठी या इंधनाचा वापर केल्यास गॅसच्या तुलनेत अत्यंत कमी खर्चात इंधन उपलब्ध होते. तसेच यामुळे प्रदूषणही कमी होत असल्याची माहिती हॉटेल व्यवसायिकांनी दिली आहे. जास्तीत जास्त हॉटेल व्यवसायिकांनी तसेच घरगुती वापरासाठी नागरिकांनी या इंधनाचा वापर करावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
.jpg)