ना नफा ना तोटा तत्त्वावरील गाळ्यांच्या कामाला विलंब; नगराध्यक्ष किशोर गारोळे यांची पाहणी, प्रशासनाला झाप
जनतेच्या हितासाठी तडजोड नाही, नगराध्यक्षांची स्पष्ट भूमिका
मेहकर,नगरपरिषदेकडून अतिक्रमणधारकांना पर्यायी व्यवस्था म्हणून “ना नफा ना तोटा” तत्त्वावर हक्काचे गाळे उभारण्याचे काम हाती घेण्यात आले होते. हे काम अवघ्या तीन महिन्यांत पूर्ण होणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात जवळपास एक वर्ष उलटूनही गाळे पूर्ण न झाल्याने व्यापाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. अतिक्रमण हटविण्यात आल्यानंतर अनेक दुकानदारांचे व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाले असून काहींवर आर्थिक संकट ओढवले आहे. संतप्त व्यापाऱ्यांनी आपल्या अडचणी नगराध्यक्ष किशोर गारोळे यांच्यासमोर मांडल्या. या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष किशोर गारोळे यांनी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी भेट देत सुरू असलेल्या गाळ्यांच्या बांधकामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकारी व कंत्राटदारांवर नाराजी व्यक्त करत कामातील दिरंगाईबाबत जाब विचारला.
नगराध्यक्षांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, अतिक्रमण काढताना दुकानदारांना तात्काळ गाळे उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र ते वेळेत पूर्ण न झाल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. “जनतेच्या हितासाठी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. प्रलंबित गाळे तात्काळ पूर्ण करून संबंधितांना देण्यात यावेत,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
तसेच, सध्या जेवढे गाळे पूर्ण झाले आहेत ते तत्काळ अतिक्रमणधारकांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. एकूण कामापैकी सुमारे 80 टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित 20 टक्के काम पुढील दोन महिन्यांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
दरम्यान, नगराध्यक्षांच्या पाहणीवेळी गटनेते तथा नगरसेवक विलासराव चनखोरे, नगरसेवक नितीन तुपे, नगरसेवक पती निसार अन्सारी तसेच नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.नगराध्यक्षांच्या पाहणीनंतर गाळ्यांच्या कामाला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

.jpg)
.jpeg)