दुग्धक्रांतीकडे पाऊल! आ. सिद्धार्थ खरात यांचा पुढाकार; शेतकरी-व्यवसायिकांना मोठा दिलासा - Apala Vidarbha LIVE

Breaking

Saturday, April 18, 2026

दुग्धक्रांतीकडे पाऊल! आ. सिद्धार्थ खरात यांचा पुढाकार; शेतकरी-व्यवसायिकांना मोठा दिलासा


 दुग्धक्रांतीकडे पाऊल! आ. सिद्धार्थ खरात यांचा पुढाकार; शेतकरी-व्यवसायिकांना मोठा दिलासा

बुलडाणा जिल्हा भारतीय स्टेट बँकेची  कर्जप्रक्रिया सुलभ करण्याचे निर्देश

मेहकर मतदारसंघातील दोन्ही तालुक्यातील दुग्धव्यवसायाला बळकटी देण्यासाठी आमदार सिद्धार्थ खरात यांनी पुढाकार घेत बुलढाणा जिल्हा भारतीय स्टेट बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत (AGM )महत्त्वपूर्ण बैठक आयोजित केली. या बैठकीत दुग्धव्यवसाय वाढीसाठी तसेच शेतकऱ्यांसह व्यवसाय करणाऱ्या नागरिकांना सुलभ व तात्काळ कर्ज उपलब्ध करून देण्याबाबत  चर्चा करण्यात आली..

बैठकीदरम्यान आमदार खरात यांनी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसह लघुउद्योजकांसाठी दुग्धव्यवसाय हा स्थिर व नियमित उत्पन्नाचा प्रमुख स्रोत ठरू शकतो, असे अधोरेखित केले. त्यामुळे दुधाळ जनावरे खरेदी करण्यासाठी व त्यानुषांगिक साधने खरेदी करण्यासाठी कर्ज प्रक्रियेत सुलभता आणून पात्र लाभार्थ्यांना वेळेत आर्थिक मदत मिळावी, यासाठी त्यांनी बँक अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या. त्यांच्या या पुढाकाराला भारतीय स्टेट बँकेच्या अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत दुग्धव्यवसायासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याची तयारी दर्शवली.

या बैठकीत दुग्धव्यवसायासाठी दोन प्रमुख प्रकारच्या कर्ज योजनांची माहिती देण्यात आली. यामध्ये गायी-म्हशी खरेदीसाठी कर्ज तसेच चारा, उपकरणे व इतर आवश्यक साहित्य खरेदीसाठी कर्जाचा समावेश आहे. ‘मुद्रा’ योजनेअंतर्गत तसेच बँकेच्या विशेष दुग्धव्यवसाय योजनांद्वारे ८० हजार रुपयांपासून ते १० लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध होणार आहे. नियमित ग्राहकांसाठी अधिक सुलभ अटींवर कर्ज दिले जाणार असून, नवीन व होतकरू शेतकरी तसेच व्यवसायिकांनाही प्राधान्य दिले जाणार आहे.

तसेच, ज्या लाभार्थ्यांचा दुग्धव्यवसाय सुरू असून ते दूध संकलन केंद्रांवर दूध पुरवठा करत आहेत, त्यांनाही व्यवसाय विस्तारासाठी कर्जसहाय्य दिले जाणार आहे. छोट्या व अल्पभूधारक शेतकऱ्यांसह लघु व्यवसायिकांना विशेष प्राधान्य देत, बँकेच्या कृषी शाखांमार्फत ही कर्ज योजना राबवली जाणार आहे. मेहकर सह तालुक्यातील जानेफळ, शेदला. डोणगाव आदी ठिकाणी कृषी शाखांद्वारे या सेवा उपलब्ध राहणार आहेत.

या बैठकीला निरजकुमार (एजीएम, भारतीय स्टेट बँक, बुलढाणा), कृष्णा धरमकर (मुख्य प्रबंधक, कर्ज विभाग), प्रशांत चौधरी (क्षेत्र उपप्रबंधक), सुनिकरण सर (शाखा व्यवस्थापक, कृषी विकास शाखा) तसेच सुनिल शिंदे (शाखा व्यवस्थापक) उपस्थित होते.दरम्यान, आमदार सिद्धार्थ खरात यांनी घेतलेल्या या पुढाकारामुळे मेहकर तालुक्यातील शेतकरी व व्यवसायिकांना दुग्धव्यवसायासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक सहाय्य मिळणार असून, स्थानिक स्तरावर रोजगारनिर्मितीला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. शेतकऱ्यांचे दरडोई उत्पन्न वाढवणे, त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे आणि शेतीपूरक व्यवसायांना प्रोत्साहन देणे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Post Top Ad

-->