मान्सूनपूर्वीच्या पावसाचा तडाखा; शिवपुरीतील शेतकऱ्याची दीड एकर केळी जमीनदोस्त, तब्बल ९ लाखांचे नुकसान
मेहकर तालुक्यातील शिवपुरी येथे मान्सूनपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडला आहे. शिवपुरी येथील शेतकरी समाधान श्रीराम सुरूसे यांच्या दीड एकर शेतातील केळीची बाग अक्षरशः उद्ध्वस्त झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे तब्बल ९ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अचानक आलेल्या जोरदार वाऱ्यासह पावसामुळे केळीची झाडे मोठ्या प्रमाणात कोसळली. अनेक महिन्यांच्या मेहनतीनंतर उभे राहिलेले पीक काही क्षणांत जमीनदोस्त झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. आधीच शेतीमालाला योग्य भाव नसताना आता अवकाळी पावसाने आणखी आर्थिक फटका बसल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.सदर नुकसानीचा पंचनामा महसूल विभागामार्फत करण्यात आला असून, शासनाकडून तातडीने आर्थिक मदत मिळावी अशी मागणी शेतकरी समाधान सुरूसे यांनी केली आहे. मान्सूनपूर्वीच निसर्गाच्या या तडाख्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या असून, सरकारने त्वरित मदतीचा हात द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
