डोणगावात स्वच्छतेचे तीन तेरा; भर रस्त्यावर कचऱ्याचे ढिग, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
डोणगाव, बुलढाणा जिल्ह्यातील मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या डोणगावमध्ये सध्या स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. डोणगाव येथील त्रिगुणी चौक परिसरात नागपूर–संभाजीनगर राज्य महामार्गालगतच मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढिग साचलेले दिसत आहेत.दररोज हजारो नागरिक, वाहनधारक आणि प्रवासी या मार्गाने ये-जा करतात. मात्र रस्त्यालगत पडलेल्या कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरत असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे आता पावसाळ्याचे दिवस सुरू होत असल्याने या कचऱ्यामुळे संसर्गजन्य आजार पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, ग्रामपंचायत प्रशासनाकडून स्वच्छतेबाबत पूर्णपणे दुर्लक्ष होत असून वेळेवर कचरा उचलला जात नाही. आरामाशी समोरील परिसरातही कचऱ्याचे मोठमोठे ढिग साचलेले असून प्रशासन मात्र झोपेचे सोंग घेत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.डोणगाव हे नागपूर.संभाजीनगर राज्य महामार्गावरील महत्त्वाचे गाव मानले जाते. अतिक्रमण, स्वच्छता तसेच विविध राजकीय विषयांमुळे डोणगाव कायम चर्चेत असते. मात्र आता गावाची ओळख अस्वच्छतेमुळे होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.पावसाळ्यापूर्वी गावात स्वच्छता मोहीम राबविणे, नाल्यांची साफसफाई करणे आणि नियमित कचरा व्यवस्थापन करणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात परिस्थिती उलट दिसत असल्याने ग्रामपंचायत प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.दरम्यान, संबंधित प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन कचऱ्याची विल्हेवाट लावावी व नियमित स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
