वऱ्हाडाच्या क्रुझरमध्ये घुसले २५ फुटांचे अँगल; हिवरा साबळे फाट्यावर भीषण अपघात, महिला व बालक जखमी! - Apala Vidarbha LIVE

Breaking

Saturday, June 20, 2026

वऱ्हाडाच्या क्रुझरमध्ये घुसले २५ फुटांचे अँगल; हिवरा साबळे फाट्यावर भीषण अपघात, महिला व बालक जखमी!

 


25 फुटांचे अँगल थेट वऱ्हाडाच्या क्रुझरमध्ये घुसले; हिवरा साबळे फाट्यावर थरारक अपघात,

बुलढाणा -डोणगाव पोलीस स्टेशन हद्दीतील हिवरा साबळे फाट्याजवळ मुंबई-नागपूर राज्य महामार्गावर शुक्रवारी (20 जून) दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास झालेल्या भीषण अपघाताने परिसरात खळबळ उडाली. मेहकरकडून डोणगावकडे येणाऱ्या मालवाहू वाहनातील तब्बल 20 ते 25 फुटांचे लोखंडी अँगल समोरून येणाऱ्या वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या क्रुझर वाहनाच्या केबिनमध्ये घुसल्याने अनेक वऱ्हाडी जखमी झाले. 25 फुटांचे अँगल थेट वऱ्हाडाच्या गाडीत; थरारक अपघाताचा VIDEO!" 🚨🚑

 यात महिला व लहान मुलांचाही समावेश आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मालवाहू वाहन (एमएच-47 वाय-3976) हे लांब लोखंडी अँगल घेऊन जात होते. वाहनाच्या दोन्ही बाजूंनी सुमारे सहा ते सात फूट अँगल बाहेर निघालेले होते. त्याचवेळी डोणगावकडून मेहकरकडे लग्नासाठी वऱ्हाड घेऊन जाणारे क्रुझर वाहन (एमएच-37 एएच-2722) समोरून येत होते. दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक होताच लोखंडी अँगल थेट क्रुझरच्या केबिनमध्ये घुसले. अपघाताचे दृश्य पाहून उपस्थितांच्या अंगावर शहारे आले.अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. डोणगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व बचावकार्य हाती घेतले. जखमींना त्वरित उपचारासाठी मेहकर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.या अपघातानंतर लांब लोखंडी अँगलची वाहतूक कशा नियमांनुसार केली जात होती, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अवघ्या दहा फुटांच्या वाहनातून २५ फुटांहून अधिक लांबीचे अँगल वाहून नेण्यात येत असल्याचे दिसून आले. त्यामुळे संबंधित वाहनचालक व मालवाहू वाहन मालकावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.मोटार वाहन कायदा व केंद्रीय मोटार वाहन नियमांनुसार वाहनाच्या मागील बाजूस बाहेर आलेला माल मर्यादित अंतरापर्यंतच नेता येतो. अशा मालाला लाल झेंडा, परावर्तित चिन्ह (Reflective Marker) तसेच आवश्यक सुरक्षा उपाय करणे बंधनकारक असते. वाहतुकीमुळे इतर वाहनधारकांच्या जीवितास धोका निर्माण होणार नाही, याची जबाबदारी वाहन मालक व चालकाची असते.

या अपघातानंतर परिवहन विभाग व पोलीस प्रशासनाने अशा धोकादायक पद्धतीने मालवाहतूक करणाऱ्या वाहनांवर विशेष मोहीम राबवून कठोर कारवाई करावी, अशी मागणी सुज्ञ नागरिकांकडून होत आहे. अन्यथा भविष्यात आणखी मोठी जीवितहानी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Post Top Ad

-->